छत्रपती संभाजीनगर, (सांजवर्ता ब्युरो): हसूल मध्यवर्ती कारागृहात कच्चा कैदी म्हणून असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. साहेबराव दगडू सोनवणे (रा. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) असे मृत कैद्याचे नाव आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र तुरुंग प्रशासनाने वेळेवर उपचार न केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हसूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे जमिनीच्या वादातून एकाची हत्या झाली होती. या गुन्ह्यात साहेबराव सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. गेल्या १९ महिन्यांपासून ते हर्मूल कारागृहात कच्चा कैदी म्हणून होते. त्यांच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
कारागृहात असतानाच सोनवणे यांची प्रकृती अचानक बिघडली. मात्र जेल प्रशासनाकडून त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याने त्यांनी थेट मानवाधिकार आयोगाच्या माध्यमातून उपचारासाठी परवानगी मिळवली होती. त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सोनवणे यांचा सोमवारी (दि. १३) दुपारी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रशासनाकडून हलगर्जी झाल्याचा आरोप
साहेबराव सोनवणे यांना कारागृहात असताना आजारपणाच्या सुरुवातीलाच वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यांचा नक्कीच जीव वाचला असता, असा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. जेल प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा संताप व्यक्त करत, जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions










